अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मध्यवर्ती संस्था !
एक दृष्टिक्षेप ! (संदर्भ : “चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचा इतिहास. लेखक, प्र. ल. मोकाशी)
चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातीचा संघटनात्मक इतिहास जवळपास १३५ वर्षे जुना आहे. मुंबईतील मल्हार खंडेराव चिटणीस, काशिनाथ बाबाजी प्रधान आणि नागपूरचे गंगाधरराव माधव चिटणविस यांच्या संयुक्त प्रयत्नातून १८८६ साली मुंबईत “चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाज” नावाची संस्था स्थापन झाली. अखिल भारतातील आपल्या ज्ञाती संबंधी एकूणच सर्वांगीण विचार करण्याच्या हेतूने ही संस्था स्थापन करण्यात आली होती. ह्या संस्थेपासून प्रेरणा घेऊन पुढे भारतात मुंबई, ठाणे, पुणे, बडोदे, पेण, महाड, नागोठणे, नाशिक, धरमपूर, इत्यादी ठिकाणी ज्ञाती संस्थांची उभारणी होत गेली. ह्या सर्वांमुळे ज्ञातीविषयक विचाराला देशभर चालना मिळू लागली. ह्यातूनच ज्ञातीच्या प्रश्नांविषयी चर्चा करण्याच्या हेतूने १८९२ साली एप्रिलमध्ये सर्वप्रथम नाशिक येथे समाजोन्नती परिषद घेण्यात आली. ह्यात तत्कालीन ज्ञातीविषयक विविध समस्यांवर विचारविमर्ष करण्यात आला. ह्या परिषदेनंतर कधी निश्चित कालावधीनंतर तर कधी दीर्घ काळानंतर अशा समाजोन्नती परिषदा होत राहिल्या. त्यातूनच ज्ञाती संघटनाचा पाया दृढ होत गेला. आजवर एकूण १८ समाजोन्नती परिषदा पार पडल्या आहेत.
१९५६ साली दादर येथे ज्ञातीची ६वी परिषद संपन्न झाली. ह्या समाजोन्नती परिषदेत दादरच्या ‘चांद्रसेनीय कायस्थ प्रभु सभा’ ह्या संस्थेला “मध्यवर्ती” संस्थेचे स्थान देण्यात आले होते. परंतु १९६८ साली दादर येथेच झालेल्या ८व्या समाजोन्नती परिषदेत “मध्यवर्ती संस्था” ही एक स्वतंत्र संस्था असावी असे ठरविण्यात आले व यासाठी २१ सदस्यांची एक अस्थायी समिती नेमण्यात आली. १९७१ साली ठाणे येथे झालेल्या ९व्या समाजोन्नती परिषदेत “मध्यवर्ती” संस्थेच्या घटना व नियमावलीस मान्यता देण्यात आली. १९७५ साली नागपूर येथे झालेल्या दहाव्या परिषदेपासून समाजोन्नती परिषदा घेण्याची जबाबदारी ह्या मध्यवर्ती संस्थेकडे आली. सन १९७८ मध्ये ह्या संस्थेची मा. धर्मादाय आयुक्तांकडे रीतसर नोंदणी करण्यात आली. दीर्घ काळापर्यंत मध्यवर्तीचे कार्यालय हे दादर येथील ज्ञाती संस्थेच्याच जागेत होते. सध्या ठाणे येथील ज्ञाती संस्थेच्या खारकर आळी येथील “ठाणे सीकेपी हॉल” येथून मध्यवर्तीचे कार्य चालते.
भारतभर पसरलेल्या आपल्या ज्ञातीसंस्थाना जोडणारा एक स्वतंत्र दुवा असावा ह्या हेतूने स्थापन झालेल्या मध्यवर्ती संस्थेने स्वतःचे ध्येय, उद्देश व कार्य निश्चित केलेले आहे. “ज्ञातीहिताय, राष्ट्रहितायच” हे मध्यवर्तीचे ब्रीद आहे तर “कायस्थ तितुका मेळवावा” हे संस्थेचे ध्येय आहे. देशभरात विखुरलेल्या आपल्या ज्ञातीच्या लहान-मोठ्या संस्थांमध्ये समन्वय साधून त्यांच्या कार्यात एकसूत्रीपणा आणणे, ज्ञातीच्या उन्नतीसाठी सर्वांगीण प्रयास करणे तसेच, निश्चित कालावधीने ठिकठिकाणी ज्ञाती परिषदांचे आयोजन करणे व परिषदेतील ठरावांची अमलबजावणी करणे ही मध्यवर्तीच्या एकूण कार्याची रूपरेषा आहे.
कार्याच्या सुसूत्रतेसाठी मध्यवर्ती देशात एकूण बारा विभागात काम करते. हे बारा विभाग असे,:
१. मुंबई पूर्व विभाग
२. मुंबई पश्चिम विभाग
३. रायगड विभाग
४. पुणे विभाग
५. विदर्भ विभाग
६. मराठवाडा विभाग
७. नाशिक विभाग
८. कोल्हापूर विभाग
९. डहाणू-पालघर विभाग
१०. कोंकण-गोवा विभाग
११. गुजरात विभाग
१२. मध्यप्रदेश विभाग
आजमितीला अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मध्यवर्ती संस्थेच्या कार्यकारिणीत पाच विश्वस्त, एक अध्यक्ष, तीन उपाध्यक्ष, तीन व्यक्ती सभासद, एक कार्यवाह, दोन सहकार्यवाह, एक खजिनदार, एक संपादिका व एक उपसंपादिका कार्यरत आहेत. ह्या सर्वांच्या सहकार्याने ज्ञाती कार्य करीत असतानाच “ज्ञाती संपर्क अभियानाच्या” माध्यमातून समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोचण्याचा प्रयत्न मध्यवर्तीचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष श्री. समीर जयंत गुप्ते व त्यांचे सहकारी करीत आहेत.
इतिहास, साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, उद्योग, व्यवसाय, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात कार्य करण्याचा प्रयत्न अ.भा. चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मध्यवर्ती संस्थेतर्फे सातत्याने केला जात आहे. विशेष म्हणजे, आपल्या ज्ञातीचे वेगळेपण कायम ठेवत असतानाच भारतभर पसरलेल्या “कायस्थ” समाजाशीही संबंध प्रस्थापित करून एक व्यापक सामाजिक कार्य उभे करण्याचा प्रयत्नही विद्यमान कार्यकारिणी करीत आहे. देशभर विखुरलेल्या विविध ज्ञाती संस्था व परिवार यांच्या सहयोगातून अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मध्यवर्ती संस्था अधिकाधिक समाजाभिमुख कार्य करेल ह्यात शंका नाही.
संकलन : संजीव माधव सुळे.—————————————-
kayasthayugandhar@gmail.com, abckpms@gmail.com
